*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#छत्रपती शंभूराजे*
छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द अवघी आठ-नऊ वर्षांची; पण केवढी संघर्षमय!
घरीदारी शत्रू आणि सीमांवरही शत्रू! त्या सर्वांशी एकाच वेळी संघर्ष. अशा संघर्षातील दोन घटना पाहा.
पहिली घटना आहे जून-जुलै १६८२ ची. औरंगजेबाने स्वराज्याच्या सर्व सीमांतून आपल्या फौजा आत घुसविल्या व प्रखर हल्ले चढविले; पण छत्रपती संभाजी महाराजांनी तितकाच प्रखर प्रतिकार करून हे सर्व हल्ले परतवून लावले. मराठ्यांचे स्वराज्य हां हां म्हणता बुडवून टाकू, अशी उमेद धरून व घमेंड बाळगून दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला हा फार मोठा धक्का होता. या संदर्भात इंग्रज आपल्या पत्रव्यवहारात लिहितात "बादशहाला आलेल्या अपयशाने तो इतका चिडून गेला की, त्याने आपल्या डोक्यावरची पगडी त्राग्याने फेकून दिली असून, संभाजीराजाचा नायनाट केल्याशिवाय ती पुन्हा डोकीवर न
घालण्याची त्याने शपथ घेतली आहे!"
दुसरी घटना आहे, पुढच्याच वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यातील. स्वराज्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या फोंडा किल्ल्यावर चाल करून आलेल्या पोर्तुगीज
व्हाइसरॉयचा छत्रपती संभाजी महाराजांनी सपाटून पराभव केला आणि त्याला गोव्याकडे
पळवून लावले! गोव्यापर्यंत त्याचा पाठलाग करून महाराजांनी पोर्तुगीजांचे जुवे बेट
काबीज केले. आता पुन्हा व्हाइसरॉय जुवे बेटावर चालून आला. तेव्हा त्याला पुन्हा
इतका जबरदस्त मार दिला की, त्याला पळता भुई थोडी झाली! कसाबसा तो आपल्या राजधानीत पोहोचला. संभाजी महाराजांची आता प्रत्यक्ष गोव्यावर स्वारी होणार, हे स्पष्ट दिसू लागताच व्हाइसरॉयने सेंट झेवियरची शवपेटी उघडून त्याच्या पायाशी त्याने आपला राजदंड ठेवला आणि गोव्याचे रक्षण करावे म्हणून डोळ्यांत
अश्रू आणून त्याने झेवियरची प्रार्थना केली!